Shispencil

/ Vivek Kale Nature Photography
 

 
 


 

शीसपेन्शिल
September 2012
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded.
Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation.
 
पोर्णिमेचा दिवस साधुन सह्याद्री च्या घाटमाथ्यावर जाण्याचा बेत शिजला. सुर्य मावळुन दोन एक तास उलटले होते. बोटा गाव मागे टाकत पाचनई कडे कुच चालु होती. चंद्राच्या प्रकाशात सारे माळरान लख्ख दिसत होते. माळरानावरच्या बारक्या वाड़्या गणेशोत्सवाच्या निमित्याने उत्साहात दिसत होत्या. एकामागे एक बाभळ्या मागे टाकत, गाडी लहान सहान टेकड़्या चढु लागली. वाटेतल्या गावांत गणेश त्रयोदशीचे जागरण चालु होते. बेलापुर गावात लोकसंगीत, कोतुळ च्या मंडपातल्या गणपतीचे सामजिक विषयावरचे कटपुतल्यांचे नाटक, ब्राम्हणवाड़्यातले भक्तीसंगीत धावत्या गाडीतुनच ऐकत आम्ही मोच गाठली.
मोचेजवळ दोन नद्यांचा संगम होतो. आजोबाच्या बाजुने येणारी नदी हरिश्चंद्रावरुन येणाऱ्या मंगळगंगेला मिळते. डोंगराला विळखा घालुन जाणारे पाणी रातच्याला आपले मन हलके करते, धुके बनते. धुक्याचा विळखा घातलेला हा मोच रात्री अप्रतिम दिसतो. रुपेरी चांदण्यात चमचमणारी सोनेरी सोनकी वाऱ्याच्या झुळुकेबरोबर डोलते, तेंव्हा, मन उचंबळुन येते. वाऱ्याच्या कमी जास्त प्रवाहामुळे कधी मोचेचा डोंगर धुक्यात हरवतो तर कधी तो आपले डोके धुक्यातुन बाहेर काढुन दाखवतो.
 

 

 
Cloudscape at night, Paachnai, Western ghats, India
 
जंगलातल्या झाडावरच्या पानांची सळसळ, आणि दुर गावातल्या मारुतीच्या देवळात चाललेले जागरण भजनाचा आवाज, डोलणारी सोनकी, आकाशातले चांदणॆ व पुर्णचंद्र यात अवघा आसमंत नाट्यमय वाटत होता. मधेच कोणी रातवा भरारी मारत होता. बेडक, रातकिडे आपले वाद्यवृंद वाजवत होते.
मोचेला मागे सोडुन गाव गाठले. अर्धे अधिक गाव मारुतीच्या देवळात भजनात दंग होते. गावची मुक्कामाची एस टी वडाखाली निपचीत विसावली होती. दिवसभर गावच्या रस्त्यांवर धावपळ करुन तीच कंबरड मोडल होत. रातचा मुक्काम तेथेच करण्य़ाचा निर्णय झाला.
 

 

 
The microhabitats of basalt plateau, Harishchandragad,Western ghats, India
 
पहाटे कोंबड्याचे आरवणे होताच, आम्ही आवरावर केली. पोटात पोहे व चहा ढकलला. भल्या सकाळी आम्ही डोंगरवाट धरली. वाटेकडे कुठे सोनकॆऎ, तर कुठे जांभळी स्मिथिया, फुलली होती. पुण्याच्या आसपास बरेच डोंगर अधाशी लोकांनी पोखरले आहेत. येथे मात्र हे चित्र दिसले नाही म्हणुन उगाच इथल्या माणसांबद्दल आदर वाटला. चढणीवरचा जांभुळ, करप मागे टाकत आम्ही झपाझप चढत, धबाबा गाठला. तेथील उथळ कुंडात जलक्रीडा केली. गडावर बसलेल्या बालेकिल्याने व तारामतीने आमच्याकडे पाहुन जुनी ओळख दिली.
देवळातल्या महादेवाच्या पिंडीला, बाजुच्या गणपतीला, गुहेतल्या गणपतीला, देवडीतल्या मारुतीला सर्वांना नमन करुन आम्ही कोकण कडा गाठला. कळसुबाई, आजोबा, घनचक्कर, कलाडगड, कोंबडा, नाप्ता, भैरव डोंगर, पंगतीत बसुन उन्हं खात होते. दुसऱ्या बाजुस भैरवगड, नानेघाट, सिंदोळा, माळशेज, रोहिदास उन्हं खात निवांत पहुडले होते. कोकणातल्या बेलपाड़्याची दाटीवाटीने बसलेली कौलारी छप्परे धुकं सोसत उन्हाची वाट पहात होती. गावातले पाण्याचे बंब अन चुली धुराच्या लहान मोठया वेलांटया हवेत मारत होत्या.
 

 

The clouds surging along the cliff adorned by Sonki wildflora, Harishchandragad, Western ghats, India
 
निळे आकाश पातळ तांबुस सफेद ढगांमागे दडले होते. अधुन मधुन आभाळाचा हा सफेद अंगरखा फाटला होता. थोड्या वेळातच पडदा हटला, निरभ्र आभाळ दिसु लागले. माळशेज व साधळे घाटातुन पुर्वेचे ढग ओळीने घाट उतरु लागले. कड्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या अणुकुचेदार रोहिदास व कॊम्बड्याच्या शिखरांवर सफेद ढग चढाई करु लागले. दोन्ही शिखरांच्या अंगा खांद्यांवर खेळुन, ढगांनी कड्याकडे आक्रमण सुरु केले. बघता बघता बेलपाड़्याचे गाव ढगात दिसेनासे झाले.
आसमंत सफेद झाला. थोड्यावेळातच कड्यावरची रानफुले व आम्ही असे फक्त राहिलो, बाकी सर्व ढगाआड झाले होते. मध्यान्ही आम्ही तंबु ठोकला. रानातला बाळु सोनु भारमल, चुल पेटवु लागला. चुलीच्या धुसफुशीकडे पाहुन ओल्या लाकडांना पुढे मागे करु लागला. धुर जास्त व आग कमी अशा चुलीवर त्याने दुधाचा फक्कड चहा बनविला.
 

 

 
The clouds surging along the cliff adorned by Sonki wildflora, Harishchandragad, Western ghats, India
 
भर उत्सवात, रानातल्या गाय, वासरांमुळे त्याला डोंगरावर रहावे लागले होते. बाकी गुराखी अन गावकरी खाली गावात गणपती विसर्जनाची तयारी करत होते. बाळुने आजुबाजुच्या डोंगरांबद्दल बऱ्याच गोष्टी सांगीतल्या. दुपारचे जेवण करुन आम्ही गायदरा गाठला. अवघे रान देवाने सोनकीच्या सोनेरी रंगात मढवले होते. खऱ्या सोन्याला सुधा हेवा वाटेल, असा सोनकीचा थाट होता. मागे नाप्ताचा डोंगर, समुद्रातल्या गलबतासारखे शिड उभारुन उभा होता.
त्याच्या खांदयावरच्या लहान नेढ्यातुन पल्याडचे ढग मुसंडी मारत होते. कलाडगडावरचा नंदी भैरोबाच्या समोर बसला होता. पलिकडे आजोबा, घनचक्कर आमच्या कडे पाहत होते. खिंडीतुन, कळसुबाई, अलंग मंडळी डोकावत होती. सोनकीकडुन थोडे तेज मागुन घेतले. रानफुले आमच्या स्वप्नाळु मनांकडे पाहुन हसली. रानातील फुले व त्यावरची फुलपाखरे, अधुन मधुन घोंगावणाऱ्या मधमाश्या तासंतास पाहुन, आम्ही पुन्हा मुक्कामी पोहोचलो.
 

 

 
Senecio bombayensis (Sonaki) flowers atop basalt plateau of Harishchandragad.
 
दुपारचा चहा झाल्यावर माथ्यावरच्या खरचुडी न्याहाळल्या. खरचुडीचे वागणॆ, त्या वनस्पती चे माश्या, किडे, यांच्या बरोबर असलेले व्यवहार, यातुन माणासाला बरेच काही शिकण्यासारखे आहे. सामाजीक बांधिलकी हे असले रानावरचे बारके झाड आपल्याला शिकवेल असे कुणाला स्वप्नात सुधा वाटणार नाही. बाळुने कड़्यावर चार महिन्यामागे झालेल्या अपघाता बद्दल आम्हाला माहिती दिली.
रौद्र निसर्गाला आव्हान दिले तर काय होते याचे वर्णन केले. कड़्याला टोकाकडे असलेली भेग बरीच मोठी झली आहे. मागच्या खेपेस ती लहान होती. पुढिल काही महिन्यात येथे मोठा अपघात होणार हे नक्की. तसे होऊ नये म्हणुन कड्याभोवती घातलेले सरकारी गंज चढलेले कुंपण कोणी हौशी महाभागांनी झोपवले आहे. कुंपणाचा दर्जा भंगारापेक्षा खराब आहे. भ्रष्टाचार पार कोकणकडय़ापर्यंत पोहोचला आहे.
 

 

 
Senecio bombayensis (Sonaki) flowers atop basalt plateau of Harishchandragad at sunset.
 
वळवाचे सफेद ढग आभाळात बेधुंद होऊन नाचले, फुलले. सुर्यास्ताच्या वेळेस ढगांनी तांबुस गुलाल उधळला. बेलपाड्यातले दिवे लागले. दुर कोकणात कडकडाट होत होता. खालच्या गावांतुन गणेश विसर्जनाचा ढोल ताशा वाजु लागला. वारा गार झाला. कानटोप्या पिशव्यांतुन बाहेर पडुन डोक्यावर चढल्या. उत्सव संपला. ढोल ताशा थांबला. आम्ही तंबुत परतलो. सकाळला परत येतो असे सांगुन बाळु सोनु भारमल आपल्या गुरांच्या व वासरांच्या काळजीने रानात निघुन गेला. रोज दोन कळश्या दुध विकुन तो खुश होता.
चुल पेटवुन चार पैसे त्याला मिळत होते त्याचे त्याला फारसे आकर्षण नव्हते. निसर्गाचा विनाश न करता सुखी रहाण्याची त्याची व्रुत्ती पाहुन बरे वाटले. पशु वैद्यकीय मदत न घेता झाडपाला लावणाऱ्या ठाकर वैद्याकडुन तो त्याच्या गाई, म्हशींचे आजार बरे करत होता. असे बरेच बाळु या भागात असल्यामुळेच येथे गिधाड अजुन जिवंत आहेत. डाक्टराला ५ हजार रुपड देण्यापेक्षा ठाकराला शंभर रुपड दिल तरी त्याच काम होत होतं. नकळत बाळु, गिधाडांच भल करत होता. त्याला हे समजावुन सांगताच त्याला बरे वाटले.
 

 

 
Senecio bombayensis (Sonaki) flowers atop basalt plateau of Harishchandragad at sunset.
 
आपाण सुद्धा शहरी माणसासारखे चकाचक व्हावे असे त्याच्या मनात अजिबात नव्हते. तो त्याच्या रानातल्या जगण्यात खुप खुश आहे रात्री पाउस पडुन तंबुत पाणी तर शिरणार नाही ना ? या चिंतेने मी त्याला पावसाबद्दल विचारले. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला "वाटत होत आजला पाणी येइल, पर ढग तिकडच रमल्यात खाली कोकणात." ढग खरच कोकणात रमले होते, दुर कोकणात इजा चमकत होत्या.
इकडे आमच्या डोक्यावर आभाळ निरभ्र होते. वासरांच्या काळजीने बाळुचे अनवाणी पाय रानाकडे वळले. चुलीतले निखाऱ्यांसारखे आभाळ सुर्यास्तानंतर तांबडे झाले होते. पुर्वेस चांदण्या चमकत होत्या, घनचक्करावर दुर, ध्रुव तारा टिमटिम करत होता. पोर्णिमेचा चंद्र साऱ्या रानावर आपली माया पसरवत होता. वारा जंगलातल्या झाडीशी झुंबड करत होता. त्याची सळसळ कमी जास्त होत होती.
 

 

 
Senecio bombayensis (Sonaki) flowers atop basalt plateau of Harishchandragad at sunset.
 
रात्र भर वाऱ्याने तंबुशी वादावादी केली. अधुन मधुन त्यांची हातापायी होत होती. पहाटे त्यांचे नाट्य थांबले. निरव शांततेत जवळचा झरा त्याची झुळझुळ ऐकवत होता. चंद्र मावळतीला आला होता. पश्चिमेला असलेल्या कोंबड्य़ाच्या तुऱ्याजवळ तो उतरत होता. आजुबाजुच्या पाण्याच्या कुंडात त्याचे प्रतिबिंब वाऱ्याच्या अवखळ पणा बरोबर खेळत होते. वारा जणु प्रतिबिंबास गुदगुल्या करत होता. तांबडा होत, चंद्र क्षितिजावरच्या धुक्यात मावळला. आभाळ निळे दिसु लागले. पुर्वेस त्याच वेळी सुर्य उगवत होता.
पुर्वेच्या क्षितिजावर झोपलेल्या ढगामुळे, सुर्य देवाची स्वारी थोडी उशिराच पोहोचली, थोडक्यात त्याची व चंद्राची गाठ्भेट चुकली. सारा घाट्माथा आम्ही पाया खाली घातला. माळशेज घाटात मुम्बै च्या गाड़्या नगरकडे रेंगाळत तर नगरच्या गाड़्या मुम्बै कडे दबकत जाताना दिसत होत्या. पल्याड भैरवगड शिपायासारखा उभा दिसला. तांबड फुटल. कड़्याच्या टोकावर वानर आमच्याकडे दुरुनच कुतुहलाने पाहत होते. सोनकीमुळे डोळे दिपावुन गेले. असंख्य रानमाश्या, मधमाश्या, फुलपाखर यावर रमलेली होती.
 

 

 
Atop basalt plateau of Harishchandragad at sunset.
 
कड़्याकडे दगडावर दत्तु बसला होता. दुर कोकणात तो काही तरी न्याहाळत होता. जास्त बोलत नव्हता. दत्तु बाळु सोनु भारमल चा पोरगा. पायात चपला नव्हत्या. तो शाळेला सुट्टी आहे असे पुटपुटला. इयत्ता चौथी, शाळा खडकीत. दत्तु कधीच कड़्यावरुन दिसणाऱ्या जगापल्याड गेला नव्हता. गायरानात राहाणाऱ्या बाळुचा हा दत्तु शाळेत जातो हे फार कौतुकास्पद वाटले. चुलीवर आमची मॅगी रटरटली. बाजरीची भाकर खाणारा दत्तु आमच्या मॅगीकडे पाहुन मनातल्या मनात आमच्यावर हसला.
असले काहीबाही तो खात नाही, असे बाळु म्हणाला. दत्तु पकडुन आणलेल्या खेकड़्याला बांधण्यात रमला होता. संध्याकाळच्या कालवणाची त्याची ही तयारी. भैरोबाच्या डोंगरावरच्या उत्सवाच्या चार गप्पा झाल्या. पुढ्च्या महिन्यात होणाऱ्या कलाडगडावरच्या वाट करी उत्सवाचे आमंत्रण मिळाले. आम्ही त्यांना निरोप दिला. रान व कडा मागे टाकीत महादेवाचे पुरातन मंदिर गाठले. सोनकी व तेरड़्याने मंदिराला घेरा घातला होता.
 

 

 
Moon set at dawn atop basalt plateau of Harishchandragad.
 
आकाशात "तुकडा" ढगांची दिंडी चालली होती. मंदिराजवळ कोकणातुन आलेल्या चार पोरांनी कापडावर रेखाटन व चित्र रंगवण्याचा ध्यास घेतला होता. पाण्यातले त्यांचे रंग कापडावर शिताफीने पसरत होते. मंदिराची त्यांची चित्र तिथल्या वातावरणात तेजस्वी वाटली. त्यांचे कौतुक करुन आम्ही गुहेतल्या गणेशाला नमन केले. तिथल्या भारमलाने, गणपतीच्या डागडुजीबद्दल आम्हाला माहिती दिली. बऱ्याच वेळा येथे येऊन मला हि माहिती प्रथमच कळाली.
आम्ही डोंगर उतरु लागलो. तासाभरातच आम्ही गावात पोहोचलो. बाजरीची भाकर, पिठल, चाईची व मटकीची भाजी, कांदा व मिरची असा बेत झाला. गरमागरम भाकऱ्या फस्त झाल्या. गावतल नव टाक पाण्यान काठोकाठ भरल होत. त्यात दुरच्या कलाडगडाच प्रतिबिंब उतरल होत. आभाळ भरुन आलेल होत. वार थिजल होत. शेताकडे पाहुन, भाताला थोडा पाउस पाहिजे असे गावकरी म्हणाला. घरासमोर येडिंगाची फळ वाळत टाकली होती. समोरच्या घरातल पोर खेकड्याबरोबर खेळत होत.
 
 
Evening on plateau of Harishchandragad.
 
त्याच्या नाकातला शेंबुड ओठावर येउन थबकला होता. आम्ही गाव सोडल. पिशवीतल्या शिशपेन्शिली बाहेर आल्या. वाटेत भेटणाऱ्या पोरांना पेन्शिली वाटण्यात आल्या. दुसरीतला रमेश पेन्सिल मिळताच खुश झाला. त्याच्या कातकरी आजीला त्यापेक्षा जास्त आनंद झाला. गाडीमार्गाने आम्ही मोच मागे टाकली. मोचे जवळ टेकाडावर बसलेल्या म्हाताऱ्याने आम्हाला मोचे बद्दल चार गोष्टी सांगितल्या. वाटेत चाळीस - पन्नास पेन्सिली संपल्या. लव्हाळी, कोतुळ, ब्राह्मणवाडा, बेलापुर गावे मागे टाकुन आम्ही बोटा गाव गाठल व परतीचा मार्ग धरला.
डोंगरावरच्या कड़्यामुळे, सोनकीच्या तेजामुळे, मावळणाऱ्या चंद्र दर्शनामुळे, मोचेच्या चमत्कारामुळे, रानातल्या झऱ्याच्या झुळझुळुमुळे, देवळाजवळ पाहिलेल्या चित्रकाराने काढलेल्या चित्रामुळे, नाप्ताच्या जहाजी आक्रुतीमुळे, कलाडगडाच्या नंदीमुळे, तेरड्याच्या तुऱ्यांमुळे, सुर्यास्ताच्या गुलाबीपणा मुळे, ढगांच्या अवखळ्पणामुळे, पहाटेच्या शुक्र ताऱ्यामुळे, भैरवगड, माळशेज, नाणेघाट, आजोबा, घनचक्कर, भैरोबा यांच्या रुद्र अभिमानामुळे, पुसट का होइना कानावर पडलेल्या जागरणाच्या भजनामुळे, हातातल्या शिसपेन्शिली पाहुन हसलेल्या, भारावलेल्या चेहेऱ्यांमुळे मन प्रफुल्लित झाले.
 


Contact me at kale_v@rediffmail.com for any queries and suggestions.